सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, आमदार शंकरभाऊ मांडेकर व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुळशी : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली पावसाची अनिश्चितता आणि पिकांच्या नुकसानीची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी केली आहे.
याबाबत सभापती मंदाताई शेळके यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार, लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन साद करून मुळशी तालुक्यातील सद्यस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मुळशी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने प्रमुख पीक असलेल्या भात पिकावर संकट निर्माण झाले आहे. सध्या भात पीक पोटरी व निसवण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असून पावसाअभावी अनेक ठिकाणी भातपिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे भाताची पुनर्लागवडही उशिराने झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाने मोठी उघडीप दिल्याने भात पिकाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची परिस्थिती आहे.
त्यामुळे केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यातील सद्य परिस्थितीची महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मुळशी तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
