Pune News पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोने मुळशी तालुक्यातील माण सजा येथील तलाठीविरोधात लाचखोरीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी तलाठी संतोष प्रल्हाद राणे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
आरोपी संतोष प्रल्हाद राणे (वय 45) हे माण सजा, तालुका मुळशी येथील तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे 35 वर्षीय पुरुष असून त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये स्वतःचे आणि भावाचे नाव नोंदवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.
तक्रारीनुसार, या कामासाठी तलाठी राणे यांनी सुरुवातीला 1,25,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1,00,000 रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. उर्वरित 25,000 रुपयांसाठी तक्रारदाराकडे सतत मागणी केली जात होती. याबाबत तक्रारदाराने 11/05/2026 रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे येथे तक्रार दाखल केली होती.
यानंतर 14/05/2026 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणीदरम्यान तलाठी संतोष राणे यांनी एकूण 1,25,000 रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यातील 1,00,000 रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे समोर आले. तसेच उर्वरित 25,000 रुपयांची लाच मागितल्याचेही स्पष्ट झाले.
त्यानुसार 19/05/2026 रोजी सायंकाळी 18.06 वाजता अॅन्टी करप्शन ब्युरोने माण तलाठी कार्यालयात सापळा रचला. या वेळी आरोपी संतोष राणे यांनी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करत आहेत. आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
