बाणेर प्रतिनिधी (Smart city Baner) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर स्मार्ट सिटी योजना केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून एकत्रित तयार केली देशातील काही निवडक शहरामधून पुण्यातील बाणेरचा नंबर लागला मात्र सर्व्हे नं. ३१, २-बी या भागातील नागरिकांना कच्च्या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. या रोजच्या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी स्वत:च्या खिशातून पैसे काढून सिमेंट क्रॉंक्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी पैसेसुद्धा गोळा केले, त्यानुसार काम सुरू केले जाणार होते. परंतु, मूळ मालकाने दमदाटी करत या रस्त्याचे काम बंद पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.
मूळ मालकाची दबंगगिरी
मूळ मालकांकडून एकदा जागेची विक्री केली की, त्यांना विविध सेवा देणार असल्याचा विसर पडतो. असाच प्रकार सर्व्हे नं. ३१, २ बी मधील मूळ मालकाला पडला आहे. आनंद मोहिते आणि त्यांच्या नातेवाईकांनी अशाच प्रकारे जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे. १९८८ साली ३३ जणांनी मूळ मालकांकडून जमिनीची खरेदी घेतली आहे. या खरेदीखतामध्ये ६ मीटरचा रस्ता वहिवाटीसाठी दिला असल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हा रस्ता नागरिकांच्या वापरात आहे.
मूळ मालकाने एकदा जमिनीची विक्री केल्यानंतर, त्याचा संबंध संपुष्टात येतो. परंतु, प्लॉटिंग करताना रस्त्यासाठी दिलेल्या जागेचा मोबदला मिळाला नाही, त्यामुळे डांबरीकरण अथवा सिमेंट क्रॉंक्रिटीकरण करायचे नाही, असा पवित्रा घेत मूळ मालक मोहिते यांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी पुणे अपडेट न्यूजशी बोलताना सांगितले.
महापालिकेकडून एक कोटी निधी मंजूर
या परिसरातील नागरिकांकडून पुणे महापालिकेला कर भरला जातो, त्या बदल्यात नागरिकांना सुख सुविधाची अपेक्षा असते म्हणून नागरिकांनी एकत्र येत या भागातील स्थानिक माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे रस्त्याच्या कामाची मागणी केली, नागरिकांनी मागणी केल्यानुसार पुणे महापालिकेने त्यांना रस्ता तयार करून देण्यासाठी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता.
परंतु, मूळ मालकाने आमची जागा रस्त्यात गेली असल्याने महापालिकेने टीडीआर किंवा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार महापालिकेचे आणि मूळ मालकाचे बोलणेसुद्धा झाले होते. परंतु रस्त्याच्या कामाला विरोध करण्यात आला. त्यानंतर अनेक दिवसांनंतरही रस्ता होत नसल्याने नागरिक त्रासले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून रस्त्याचे काम मार्गी लागत नाही, त्यामुळे नागरिकांनीच स्वत:च्या पैशातून रस्ता तयार करण्याचे ठरवले.
पावसामुळे चिखल होत आहे. ये-जा करण्यास त्रास होत आहे. मुलांना जाताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता करू द्या, तुमचा महापालिकेचा काही वाद असल्यास तो तुम्ही मिटवून घ्या, आम्हाला त्रास देऊ नका, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी त्यांची समजूत काढली. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नागरिकांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन येतो, असे सांगून मूळ मालकाने तीन दिवसांची मुदत पोलिसांकडून घेतली आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम पुन्हा थांबले असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, प्लॉटिंग करताना, तसेच जमिनीचे खरेदीखत देताना रस्ता लिहून दिल्यानंतरही मूळ मालकाने असा वाद घालणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, अशा मालकांवर योग्य कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
त्यानुसार एक गुंठा जागा असलेल्या मालकाने कमीत कमी ४० हजार रुपये द्यावे, असे ठरले. त्यानुसार पैसे गोळा करण्यात आले. रस्त्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले. प्रत्यक्षात काम सुरू केले जाणार होते. त्यात पुन्हा मूळ मालकाने आडकाठी केली. त्याच्या दमदाटीमुळे या रस्त्याचे काम पुन्हा थांबले आहे. त्यामुळे नागरिकांकडून मूळ मालकाच्या विरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
रस्त्यामध्ये आमची २२ गुंठे जागा जात आहे. याचा मोबदला पुणे महापालिकेने टीडीआर स्वरुपात दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी न्यायालयात वाददेखील सुरू आहे. हा रस्ता वहिवाटीसाठी दिला आहे. नागरिकांना रस्ता वापरण्यास कोणताही विरोध नाही. परंतु, डांबरीकरण किंवा सिमेंट क्रॉंक्रिटीकरण करू नये, म्हणून विरोध केला आहे. एकदा रस्ता झाल्यानंतर, आम्हाला मोबदला मिळणार नाही. यापूर्वी आमच्या एका प्लॉटमधील रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर महापालिकेने मोबदला देण्यास नकार दिला. त्यामुळे आमचे नुकसान करू नये, अशी विनंती येथील नागरिकांना केली आहे.
- आनंद मोहिते, मूळ मालक