Pune update नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याने मोठी खळबळ उडाली. आडत बाजारातील उर्दू शाळा मतदान केंद्राबाहेर ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके आणि माजी आमदार अशोक पवार आमनेसामने आले.
मतदान करून बाहेर पडलेल्या आमदार माऊली कटकेंना अशोक पवार यांनी मतदान केंद्रात प्रवेशाबाबत जाब विचारला. ‘तुम्हाला कायद्याने मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार नाही,’ असा आक्षेप पवार यांनी घेताच दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाली. पवारांच्या सुनावणीवर कटके संतापले आणि प्रत्युत्तर देताना म्हणाले, ‘पराभव दिसायला लागल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली का?’ असे म्हणत ते तिथून निघून गेले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
