मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत.” Uddhav Thackeray यांचा शिंदेंना टोला

आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणाचा मुद्दा आता अधिक तापला आहे. जरांगे पाटील यांच्या निर्धाराला पाठिंबा देत, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणाचा मुद्दा आता अधिक तापला आहे. जरांगे पाटील यांच्या निर्धाराला पाठिंबा देत, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर मराठा समाजाच्या उपेक्षेचे आरोप केले. “मराठा समाजाला न्याय द्या, अन्यथा ही उपेक्षा अधिक असह्य होईल,” असा इशारा देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “आतापर्यंत मराठा समाजाचा केवळ वापर करून फेकून देण्यात आलं. पण आता त्यांचेच सरकार सत्तेत आहे, मग आरक्षण का देत नाहीत?” असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

याच संदर्भात त्यांनी फडणवीसांनाही लक्ष्य केले. “फडणवीसांनीच सांगितलं होतं, जर आमचं सरकार असतं तर मराठा समाजाला न्याय दिला असता. आज तुम्हीच मुख्यमंत्री आहात, मग आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही?” अशी थेट टोलाही त्यांनी लगावला. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगणारे लोक आज सत्तेत आहेत, पण प्रश्न सोडवण्याऐवजी ते फक्त टोलावाटोलवी करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

मुंबईतील आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी भावनिक हाक दिली. “मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. आज जी माणसं इथे आलेली आहेत, ती न्यायासाठी आली आहेत, दंगल करण्यासाठी नाहीत,” असं ते म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात मराठी समाजावर संशय घेतला जाऊ नये, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी आणखी एक खडा सवाल उपस्थित केला. “मग आमचं सरकार पाडलंत कशासाठी? जर आरक्षणाचा तोडगा निघणार नाही, तर तुम्हीच पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊन काय उपयोग? गेले अडीच वर्षे एक मुख्यमंत्री होते, आता अडीच वर्षे उपमुख्यमंत्री आहेत, पण निकाल नाही. मग जरांगेंना न्याय कोण देणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.