Pune News मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालावर मुंबई हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी आज आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला असून, राज्य सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत घटनेचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे.
मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा कायदा संमत केला आहे, मात्र या कायद्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण अवैध असल्याचा दावा करत हाय कोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
पुढील सुनावणी 17 जानेवारीला
दरम्यान वेळेअभावी या प्रकरणावरील युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने आता न्यायालयाने सुनावणी 17 जानेवारी पर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 जानेवारी रोजी या प्रकरणात न्यायालय नेमका काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालावर मुंबई हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे ही याचिका आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
