आंदेकर-कोमकर कुटुंबातील टोळी युद्धात आयुष कोमकर या 20 वर्षीय निष्पाप तरुणाचा बळी गेला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने बंडू आंदेकरच्या टोळीने त्याच्या सख्या नातवाची हत्या केली.
तो अवघ्या 20 वर्षांचा होता. तो शिक्षण करत होता. त्याचा या टोळी युद्धाशी काहीच संबंध नव्हता. पण कुटुंबात सुरु झालेल्या टोळी युद्धाने त्याचा बळी घेतला. पुण्यात तीन दिवसांपूर्वी ऐन गणेशोत्सवात नाना पेठेत 20 वर्षीय तरुणाची हत्या झाली. या तरुणाचं नाव आयुष कोमकर असं आहे. तो नुकताच क्लासमधून घराच्या दाराशी आला होता. या वेळी दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.
आयुषच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर हा पॅरोलवर सुटून आला होता. तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. याच हत्या प्रकरणी तो नागपूरच्या कारागृहात गेल्या वर्षभरापासून शिक्षा भोगत आहे. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याच्या टोळीने त्याच्या सख्या नातवाचा बळी घेतला. हे टोळी युद्ध कुटुंबातल्या कुटुंबात इतक्या टोकावर पोहोचलं आहे.
गणेश कोमकर स्मशानभूमीत आल्यानंतर त्याने टाहो फोडला. त्याने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलाची काय चूक होती? असा सवाल तो रडताना करत होता. यावेळी त्याने आपल्या मुलाने दिलेली खास गिफ्ट आणलेली होती. आपण जेलमध्ये असताना आयुषने आय लव्ह यू पप्पा लिहिलेलं भेटकार्ड पाठवलेलं होतं. या भेटकार्डमध्ये आयुष आणि त्याच्या वडिलांची लहानपणापासूनची फोटो होती. हे भेटकार्ड पाहून गणेश धायमोकलून रडत होता. त्याचा आक्रोश पाहून इतर नातेवाईकदेखील रडत होते. यावेळी वातावरण अत्यंत शोकाकूल झालेलं होतं.
“बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी, असं म्हणत गणेशने हंबरडा फोडला. माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला”, असं गणेश कोमकर रडत-रडत बोलत होता. “माझी चूक नसताना माझ्या मुलाला हे का भोगावं लागलं?”, असंही गणेश कोमकर रडताना पोलिसांना विचारत होता.
