Pune News पुणे महापालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांच्या उपचाराचा लाखो रुपयांचा खर्च अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतून महापालिका उचलत आहेच. पण आता माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांच्या उपचाराचा खर्चही केला जाणार आहे.
हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी व विरोधकांनी एकमताने मंजूर केला. तसेच ही योजना शिक्षण मंडळ, पीएमपीच्या माजी सदस्यांच्या पात्र कुटुंबीयांनाही लागू असणार आहे.
पुण्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी शहरी गरिब योजना राबविली जाते. पण त्याचा लाभ घेणारे लोक बनावट दाखले आणत असल्याने या योजनेसाठी मिळकतकर किती भरला जातो असा निकष लावून लाभ नाकारला जात आहे. तर दुसरीकडे माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा खर्च महापालिका उचलणार आहे. दरम्यान २०१८ पूर्वी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना आरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. २०१८ मध्ये याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यात शिक्षण मंडळ, पीएमपीच्या सदस्यांच्या कुटुंबीयांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या आर्थिक तिजोरीवर होणार आहे.
महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने वाढत्या वैद्यकीय खर्चाचा दाखला देत हा प्रस्ताव सादर केला होता. स्थायी समितीने त्यावर अभिप्राय न घेता या प्रस्तावाला थेट मंजुरी दिली. या योजनेत हृदयरोग, कर्करोग, मोठ्या शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
गेल्या दोन दशकांत मोठ्या संख्येने नगरसेवक कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ताधारक म्हणून निवडणूक प्रतिज्ञापत्रांतून समोर आले आहेत. अनेक माजी लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारांचा खर्चही महापालिकेकडून केला जात आहे. आत्तापर्यंत विद्यमान नगरसेवकांच्या कुटुंबियांचा खर्च उचलला जात होता. आता माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा खर्च उचलला जाणार आहे. एकीकडे निधीची उधळपट्टी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे राजकीय पदाधिकारी स्वतःचे हित यातून पाहत आहेत.
काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा खर्च करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय आज घेतला आहे.”
– श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
