पुणे- पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, उपअभियंता दीपक लांडे, कनिष्ठ अभियंता त्र्यंबक भागवत आणि रमेश सानप आदी अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.
स्वच्छता, सुरक्षा आणि निर्माल्य व्यवस्थापनाची योग्य तयारी झाली आहे. या कालावधीत आणि गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. या कालावधीत संकलन केंद्रांवर आणि विसर्जन घाटांवर स्वच्छता करणे, निर्माल्य गोळा करणे, वेगळे करणे, निर्माल्य कलशातील साहित्य काढून स्वच्छ करणे आदी कामे आरोग्य निरीक्षक, मुकादम व सफाई सेवक यांच्यामार्फत पार पाडली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर यांनी दिली.
