महापालिकेतील मनमानी कारभार जनतेसमोर आणा खासदार श्रीरंग बारणे

Share

ऋषी मुळीक (चिंचवड प्रतिनिधी) आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्ष बांधणीसाठी सज्ज झाली आहे. प्रशासकीय राजवटीत झालेल्या महापालिकेतील गोंधळलेल्या कारभारावर जनतेच्या मनात प्रश्न निर्माण व्हावा, यासाठी महापालिकेतील चुकीचे निर्णय व मनमानी कारभार जनतेसमोर आणण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्या.

शुक्रवारी झालेल्या शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बारणे बोलत होते. या बैठकीला महिला उपनेत्या सुलभा उबाळे, युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करा

बैठकीत स्थानिक पातळीवरील संघटनबांधणी, निवडणुकीची रणनीती, महिला आणि युवकांना संधी देण्याबाबत चर्चा झाली. शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून, घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करा आणि सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, असे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शासकीय योजना पोहोचवा, चुकीचे निर्णय उघड करा

महायुती सरकारच्या माध्यमातून घेतले जाणारे सकारात्मक निर्णय आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही बारणे यांनी केले. महापालिकेत प्रशासकांच्या कार्यकाळात झालेला निष्काळजीपणा, चुकीचे निर्णय, गैरव्यवस्थापन हे जनतेसमोर मांडावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकसंघ कार्य हे विजयाचे बळ

शिस्तबद्ध संघटन रचना, सर्व पदाधिकाऱ्यांचे एकत्रित योगदान आणि मतदारांशी प्रत्यक्ष संवाद हेच आगामी निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून देतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *