भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा – सुरेश हुलावळे यांचे आवाहन
हिंजवडी | प्रतिनिधी
‘व्हिजन विकासाचे, कमळ विश्वासाचे…’ या घोषवाक्याला अनुसरून माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी कडून जोरदार प्रचार सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजी बुचडे पाटील, हिंजवडी पंचायत समितीच्या उमेदवार वाघमारे ऐश्वर्या प्रशांत तसेच माण पंचायत समितीच्या उमेदवार बोडके रुपाली नवनाथ या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे भोर–राजगड–मुळशीचे युवा नेते सुरेश हुलावळे यांनी केले.
यावेळी बोलताना सुरेश हुलावळे म्हणाले की, माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ते लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आहे.
भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण गटात स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख उमेदवार दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवाजी बुचडे पाटील यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा, सामाजिक जाणिवेतून कार्य करणारा, विकासाभिमुख आणि संघटन कौशल्य असलेला उमेदवार भाजपाने दिला आहे. मूलभूत नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून ‘विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार’ प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न दिसून येतो.
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत सुरेश हुलावळे यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडला आहे. ‘विकासासाठी अनुभव आणि विश्वास आवश्यक असतो, आणि तो विश्वास नागरिकांनी भाजपावर दाखवला आहे,’ असे ते म्हणाले. त्यांच्या प्रचाराला महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
