नांदोशी येथे ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ हजार खाटांचे रुग्णालय;

Pune लला मंगेशकर मेडिकल फाउंडेशन’च्या अंतर्गत नांदोशी येथे ४० एकरांत प्रस्तावित ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या नावाने हजार खाटांचे रुग्णालय उभे करण्याचा निर्णय फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

या रुग्णालयाचा कोनशिला संकल्प समारंभ १६ एप्रिल ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.

ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांना रविवारी (ता. १२ ) रोजी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळाने कार्यक्रमात काही बदल केले आहेत. पूर्वनियोजित कोनशिला समारंभामध्ये आता ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्यात येणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत असतील. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयही यावेळी सहभागी होणार आहेत.

श्रद्धांजली सभा निमंत्रितांसाठी येत्या गुरुवारी (१६ एप्रिल) सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथे सायंकाळी पाच वाजता प्रकल्पस्थळी होणार आहे. या सभेत रुग्णालयाच्या उभारणीचा संकल्प व्यक्त करण्यात येणार आहे. सभेसाठी पांढरा पोशाख परिधान करून यावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

“लतादीदी आणि आशाताई या भारतीय संगीत विश्वातील अजरामर दिग्गज व्यक्तिमत्वे आहेत. त्यांच्या नावाला आणि कार्याला साजेसं भव्य रुग्णालय उभारून त्या संस्थेला दोन्ही बहिणींची ओळख देणे, हीच त्यांच्या स्मृतीला अर्पण होणारी खरी श्रद्धांजली ठरेल. सुरवातीला हजार व टप्प्याटप्प्याने ३ हजार खाटांचे मल्टीस्पेशालिटी, धर्मादाय रुग्णालय उभे राहणार आहे” अशी माहिती पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली. यानिमित्त कार्यक्रमस्थळी दुपारी ४ वाजता संगीत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.