79 व्या स्वातंत्र्यदिनी (ता. 15 ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे राज्यातील 17 सरपंचांना पत्नीसह निमंत्रित करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांचा, तर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लोंढेवाडी येथील प्रमोद ऊर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे. या दोन्ही सरपंचांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन हे आमंत्रण त्यांना देण्यात आलेले आहे.
कोरेगावचे सरपंच संदीप ढेरंगे हे ता. 12 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. ते दिल्लीत 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पंचायतराज मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत मार्गदर्शन, अनुभव कथन तसेच ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ढेरंगे हे दुसऱ्यांदा सरपंच झाले असून त्यांनी स्मार्ट कोरेगाव भीमा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रमोद लोंढे हे 2010 पासून लोंढेवाडीचे नेतृत्व करत आहेत. गावाला स्वच्छ आणि 24 तास पाणी मिळावे, यासाठी सौरऊर्जेवर पाणी योजना राबविला आहे. त्यांनी सौर वॉटरहिटर बसवून ग्रामस्थांना गरम पाणी देण्याची नाविन्यापूर्ण योजना राबवली आहे. गावात तब्बल पाच हजार रोपे लावून असून लोंढेवाडी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले आहे
