दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तरुणाने उडी मारली. यावेळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तेथील काही नागरिकांनी याबाबत पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली.
पोलिसांनीदेखील वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याच्यासोबत संवाद साधत समुपदेशन करत पोलिसांनी त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती एका नामांकित शाळेत गणित विषयाचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली. गेले दोन दिवस निराशेच्या गर्तेत सापडलेल्या या शिक्षकाने राजाराम पुलावरून उडी मारत जीव संपवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी हा मार्ग का पत्करला याबद्दल समजू शकले नाही. पोलिस शिपाई किरण केगले, प्रजोल बोरकर, आशिष राठोड यांच्या या सकारात्मक वृत्तीचे नागरिकांनी कौतुक केले. ही घटना वारजे पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. परंतु, अलंकार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना निरोप मिळाला. या कर्मचाऱ्यांनी हद्दीचा विचार न करता एक जीव वाचवण्याच्या उद्देशाने घटनास्थळाकडे धाव घेतली.
दोन दिवसांपासून विमनस्क अवस्थेत
अलंकार पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण आपल्या आईसमवेत कर्वेनगर येथे राहतो. त्याला नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईसोबत संपर्क करून बोलावून घेण्यात आले. आपल्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला हे समजताच त्या माऊलीला धक्का बसला होता. परंतु पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केल्याने हायसे वाटले. ‘गेले दोन दिवस तो विमनस्क अवस्थेत होता. बाहेर जाऊन येतो, म्हणून तो घराबाहेर पडला होता’, असे त्याच्या आईने सांगितले.
संबंधित तरुणाने राजाराम पुलाच्या कठड्यावर मोबाईल ठेवून पुलावरून नदीपात्रात उडी मारली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माणसाला विश्वासात घेत आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. पोलिस शिपाई आशिष राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता कौतुकास्पद आहे.
