Pune update: कोथरूडमधील (कै.) नानासाहेब सुतार दवाखाना हा नागरिकांना उपचारासाठी चांगला पर्याय ठरत आहे. येथे रुग्ण रांगा लावून उपचारासाठी येत आहेत. परंतु रुग्णांना बसण्यासाठी असलेल्या बाकांवरच गळती होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे उपचारांच्या सुविधा असल्या तरी भौतिक सुविधांकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी तेथील रुग्णांनी केली.
सुतार दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होते. येथे दररोज शंभरहून अधिक नागरिक उपचारासाठी येतात. त्याचबरोबर येथे गर्भवती मातांचे लसीकरणदेखील होते. प्रसूतिपूर्व नवीन नावनोंदणी, प्रसूतिपूर्व तपासणीदेखील येथे होते.
येथे पार्किंगची व्यवस्था आहे. रुग्णांसाठी माहितीचे व सूचनांचे फलकही लावलेले आहेत. तसेच रुग्णांना बसण्यासाठी बाकदेखील ठेवलेले आहेत. सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेबारादरम्यान तसेच दुपारच्या वेळी दीड ते साडेचार दरम्यान दवाखाना सुरू असतो.
येथे रुग्णांसाठी सर्व सोयीसुविधा आहेत. तसेच हवी ती औषधेही मिळतात. दवाखान्यात स्वच्छता असते व पार्किंगसाठी जागाही आहे. दुपारीदेखील दवाखाना सुरू असतो.