Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune update न्यायालयाने फसवणूक आणि बनावटगिरी (cheating and forgery) संबंधित एका प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एम. बदर यांनी मंगळवारी मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंवर फैसला घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
कलम 8 नुसार कोणत्याही आमदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास वरच्या न्यायालयात दाद मागू शकतो, पण आमदारकीवर राहू शकत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कोकाटे यांची उचलबांगडी झाल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोपांची मालिका झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वापसी होणार का? अशीही चर्चा रंगली आहे. मुंडे यांच्याकडील कृषी खाते काडून कोकाटे यांना देण्यात आलं होतं. मात्र, कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पक्ष अडचणीत आला. यानंतर त्यांच्याकडील खाते काढून ते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे आता कोकाटे यांच्यावर थेट अटकेची तलवार असून त्यांच्या जागी मुंडेंच्या वापसीची चर्चा रंगली आहे.
