Pune News महापालिका उमेदवारांबाबत बोलत नाहीत. केवळ भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा, असे सांगत आमदार सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीमार्फत लढवल्या जाणार आहेत. त्यात भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळेलच, असा दावा आमदार खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पक्षातील निष्ठावंतांना महापालिकेत उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आ. खाडे यांनीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील केवळ भाषणात बोलत असल्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्याची चिंता करू नये, असे सांगितले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोणतेही जागा वाटप ठरलेले नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघे याचा निर्णय घेतील. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ जो निर्णय देतील, त्यानुसार निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे, त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आमच्या बैठकीत बोलत नाहीत, पण भाषणात महापालिका उमेदवारांबाबत बोलतात. त्यामुळे भाषणात बोललेलं किती खरं आणि किती खोटं हे तुम्हीच ठरवा, असेही वक्तव्य आमदार खाडे यांनी केले. ४२ नगरसेवक भाजपचे असल्याने पालकमंत्र्यांनी भाजपच्या ४२ जागा व सांगलीत २२ जागा सांगितले. जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी असे सांगितले असावे.
