शहरातील पूरग्रस्त परिस्थितीत व कोविड काळात सर्वाधिक मदत शिवसेनेकडून; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मंमदवाडी प्रतिनिधी -: पुणे शहरातील मंमदवाडी महादेव नगर उंड्री पिसोळी वडाचीवाडी परिसरात सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू घटकांना दिलासा देण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे.

अन्नधान्याचे वितरण

कोरोना महामारीच्या काळात सामाजिक संस्थांची गरज प्रकर्षाने जाणवत असताना नाना भानगिरे यांनी पुढाकार घेतला. या काळात 30 हजार किलो अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. पूरग्रस्तांना तसेच गरजू नागरिकांसाठी विविध वैद्यकीय साहित्याची मदत, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, मोफत लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा सन्मान करून आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शिक्षण क्षेत्रातही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षी शंभरहून अधिक गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दहा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी थेट सहाय्य करण्यात आले असून, दहा मुली व दहा मुलांना शैक्षणिक दत्तक योजनेत समाविष्ट करून त्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मदत, तसेच द औंध सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आगामी काळात स्वतंत्र आरोग्य मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला आहे