pune सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पंचरत्न चौकाजवळ अचानक अनियंत्रित होऊन थेट पदपथावर चढल्याने सख्ख्या बहीण-भावांचा मृत्यू झाला.
या अपघातात अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) हे बहीण-भाऊ जागीच दगावले. त्यांचे मृतदेह औंध रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. तर पाचजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात प्रिया देवा प्रसाद (वय १६) व अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) गंभीर जखमी झाले आहेत. तर विमल राजू ओझरकर (वय ४०) किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ पसरली.
नशेत असल्याचा संशय; चालक ताब्यात –
नशेत बस चालविल्याचा संशय असलेल्या नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दोन मुलांच्या मृत्यूला पुष्टी करत सांगितले की, “आम्ही पीडितांची पार्श्वभूमी व घटनेचे कारण तपासत आहोत. चालकाविरोधात कारवाई सुरू आहे.”
