पुणे प्रतिनिधी :: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजू शकते. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला. नाशिकमध्ये 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहेत. या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. प्रफुल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल लोढा याच्याविरोधात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १७ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला. मात्र याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने प्रफुल लोढाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, प्रफुल लोढाने माझ्या पतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. याच बहाण्याने २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता त्याने मला बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्या हॉटेलमध्ये लोढाने मला तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्या बदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली. मी याला विरोध केला. त्यावेळी लोढाने मला तुझीही नोकरी घालवेन अशी धमकी दिली. यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध लोढाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.