गणेश विसर्जन मिरवणुकीचं वेळापत्रक जाहीर ; तासभर अगोदर सुरू होणार मिरवणूक

प्रदीर्घकाळ चालणारी विसर्जन मिरवणूक लवकर पूर्ण व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या मंडळांच्या बैठकीत यंदा विसर्जन मिरवणूक एका तास अगोदर सुरू करण्यावर सहमती झाली आहे.

तसेच, मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांना ठराविक वेळापत्रक देण्यात आले असून त्याला संबंधित मंडळांनी सहमती दर्शवली आहे.

वैभवशाली परंपरा असलेली पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा वेळेत पार पडावी यासाठी पोलिसांनी काटेकोर पावले उचलली आहेत. यासाठी प्रमुख मंडळांना ठराविक वेळापत्रक दिले असून त्याला मंडळांनी सहमती दर्शवली आहे. दरवर्षी पारंपरिकरित्या सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारी ही मिरवणूक यंदा एक तास आधी म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, निखील पिंगळे आदी उपस्थित होते.गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या क्रमावरून यंदा वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवून पोलिसांनी सर्वानुमते विसर्जन मिरवणूकीसाठी आराखडाच तयार केला आहे. त्याला मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळांनी संमती दर्शविली असून वेळ पाळण्याची हमी दिली आहे.

त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी (दि.६) सकाळी ९.१५ वाजता मानाचा पहिला कसबा गणपती टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करेल. ९.३० वाजता पुजा संपवून कसबा गणपती मिरवणुकीस प्रारंभ करून तो बेलबाग चौकात पोहोचेल. १०.१५ वाजता तेथून पुढे लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होईल. यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी १०.३० वाजता बेलबाग चौकातून पुढे जाईल.

मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती गुलाल व आरती करून ११ वाजता मार्गस्थ होईल. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे जातील. अशा प्रकारे सर्व मानाचे पाचही गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत महानगरपालिका गणपती व त्वेष्टा कासार गणपती मिरवणुकीत सामील होतील. दुपारी ४ वाजता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल.

त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबू गेनू गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व अखिल मंडई मंडळ प्रवेश करतील. ही मंडळे रात्री ७ वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील.विद्युत रोषणाई असलेली मंडळे रात्री ७ नंतर मिरवणुकीत सामील होतील. लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरून येणारी सर्व मंडळे फक्त बेलबाग चौकातूनच मुख्य मिरवणुकीत प्रवेश करतील. मानाचा पहीला कसबा गणपती अलका टॉकीज चौक पार करेपर्यंत इतर कोणतेही मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांच्या अटी..
– कोणतेही ढोल-ताशा पथकाचे स्थिर वादन नाही.

– प्रत्येक मंडळास जास्तीत जास्त २ ढोल-ताशा पथकांची परवानगी, पथकात ६० सदस्य.
– डीजे किंवा ढोल-ताशा पथक यातील फक्त एकच मंडळासोबत असेल.
– टिळक पुतळा, मंडई ते बेलबाग चौक दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई. वादनाची सुरुवात बेलबाग चौकापासूनच.
– मुख्य मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर नसेल. कोणीही रांग सोडून प्रवेश करणार नाही.
– अलका टॉकीज चौक पार केल्यानंतर ढोल-ताशा पथक सदस्यांनी परतीचा मार्ग मिरवणुकीच्या उलट दिशेने घेऊ नये.

“विसर्जन मिरवणुकीत वेळ पाळली जावी आणि विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी काटेकोर तयारी केली आहे. मानाच्या मंडळांसह इतर मंडळांनीही वेळ पाळण्याची ग्वाही दिल्याने यंदा विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तीने पार पडेल.”
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर.