गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune news Gaja Marne Bail : पुणे : कोथरुड परिसरामध्ये शिवजयंतीच्या दिनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांला गुंज गज्या मारणेच्या टोळीने मारहाण केली होती.

मारहाण प्रकरणात मोक्कानुसार कारवाई झालेल्या कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन न्यायालयाने मंजूर केला. दरम्यान गजानन मारणेला याप्रकरणात गुंतवले गेल्याचं बोलले जात असताना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पुणे पोलिस जबर झटका मानला जात आहे.

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले होते. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.