बिहारच्या सत्तानाट्याला पूर्णविराम; नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री

काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संभ्रम अखेर संपला आहे. एनडीए सरकारचे नेतृत्व पुन्हा एकदा जेडीयूचे नेते नितीश कुमारच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगत सर्व तर्क-वितर्काना पूर्णविराम दिला. फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जैस्वाल पाटण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, “१८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भाजपच्या अटल सभागृहात आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला लोकसभा-राज्यसभेतील खासदार, सर्व आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहतील. सर्वांच्या संमतीने सभागृह नेत्याची निवड केली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, “उशीरा सायंकाळपर्यंत निरीक्षकांची नियुक्ती होईल. भाजपची बैठक झाल्यानंतर एनडीएच्या आमदारांची बैठक पार पडेल आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार सभागृह नेत्याची निवड केली जाईल.”