PUNE NEWS राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ जाहीर केले असून, हे अभियान राज्यातील सर्व मंडल तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या दोन महिन्यात सहा दिवस घेतले जाणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबासंदर्भातील घोषणा केली आहे.
या अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी दररोज होणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल राज्यमंत्र्यांसह विधान परिषदेचे दहा आमदार राज्यस्तरीय समितीचे सदस्य आहेत. अभियानातील समित्यांना संपूर्ण राज्याचा आढावा, वेळापत्रक, धोरणात्मक निर्णय, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, अर्जदारांच्या यादीचे निरीक्षण, डेटा मॉनिटरिंग, जबाबदारी निश्चिती, फीडबॅक सिस्टीम आणि अभियानाचा सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्वाच्या १५ स्वरुपातील सेवा एकाच दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत.
या योजना लागणार मार्गी
या अभियानांतर्गत महसूल विभागाने एकूण १५ पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबीर स्थळी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रलंबित फेरफार, सात-बारा उताऱ्यां मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे,आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन आणि सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन आणि अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार आहेत. अकृषिक परवानगीही या शिबिरातून दिली जाणार आहे.
