एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री? मोठा राजकीय भूकंप

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप

pune news राज्यातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देत होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांचा सूर बदलला असून या निवडणुका शिंदेंच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना खिशात घातले आहे. ही राज्यातील नेतृत्व बदलाची नांदी असून पुढील महिना दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आपणास दिसतील, तसे झाले तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झाली. या बैठकीस अॅड. आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पॉवर आणि किमया काय आहे, हे पुन्हा दाखवून दिले आहे. त्यामुळे ते पुढील महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री दिसतील. शरद पवार हे चाणक्य आहेत, यात दुमत नाही. शरद पवार व एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.