Pune news – शिवसेना (उबाठा)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भावाच्या नावाने सातारा जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी छापा टाकून मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती करणारी युनिट उद्ध्वस्त केली होती.
यात सुमारे ११५ कोटी रुपये किमतीचे ड्रग्स व कच्चा माल जप्त करण्यात आल्याचा दावा अंधारेंनी लंकेला आहे. तसेच याची किंमत १४५ कोटी असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांचे आरोप काय?
सुषमा अंधारे यांनी दावा केला की, छाप्यात ४५ किलो ड्रग्स सापडले असून ते प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील पत्र्याच्या शेडमध्ये साठवले होते. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून, त्यांनी २०१७ मध्ये ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. रिसॉर्टचे नाव ‘हॉटेल तेजयश’ असून, ते प्रकाश शिंदे यांच्या मुलांच्या नावाने आहे. तेथे सात-आठ रूम बांधल्या असून, स्विमिंग टँकसह इतर सुविधा आहेत.
अंधारे यांनी सांगितले की, शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. त्याने ओंकार दिघे याला शेडची चावी दिली होती. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तेथे राहणाऱ्या तीन व्यक्तींना जेवण प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून येत होते. या तीन जणांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत? एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही? सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती लपवली असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
