स्वीकृत’साठी नेते झालेत बेजार; इच्छुकांच्या लॉबिंगमुळे स्थानिक नेते पुरते वैतागून

Pune news सध्या राजकीय वर्तुळातस्वीकृत नगरसेवक पदाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून मागच्या दरवाजाने महापालिकेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

महापालिका निवडणुकीदरम्यान पुण्यातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी तब्बल अडीच हजार जण इच्छुक होते. सर्वांना तिकीट देणं शक्य नसल्याने बहुतांश जणांना स्थानिक नेत्यांनी ‘तुमची स्वीकृत पदावर वर्णी लावून देऊ,’ असे आश्वासन दिले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे महापालिका निवडणूक लढण्यासाठी संधी न मिळालेले अनेक जण सध्या स्वीकृत नगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या इच्छुकांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या 10 जागांसाठी तब्बल 400 हून अधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून महापालिकेमध्ये 7 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

या सात स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल 300 हून अधिक जण फिल्डिंग लावून बसले आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस दोन स्वीकृत नगरसेवक निवडणार असून, त्यासाठी तब्बल 75 जणांनी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या एका जागेसाठी तब्बल 20 जण इच्छुक असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या वाढलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे स्थानिक नेते मात्र पुरते वैतागून गेले आहेत.