Pune News गंगाखेडमध्ये राजकीय वातावरण चुरशीला पोहोचले आहे. दोन दिवसांपूर्वी गंगाखेड येथील सभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर केलेल्या टीकेचा सोमवारी गुट्टेंनी परतावा दिला.
गुट्टे म्हणाले,धनूभाऊ, तुम्ही मला नीरव मोदी म्हणता, पण तुम्हीच तर विजय मल्ल्या आहात! विजय मल्ल्याच्या आणि तुमच्या आवडी-निवडी एकच आहेत. या विधानाने सभेत उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.
धनंजय मुंडेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुट्टेंनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. तुम्ही माझ्याविरोधात कोणाला उमेदवारी दिली. किती ताकद लावली, हे मला पूर्ण माहिती आहे. पण गंगाखेडची जनता माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, म्हणूनच मी प्रचंड मताधिक्याने जिंकलो,असे ते म्हणाले. तुम्ही गंगाखेडला आलात. मला परळीला पोचायला फक्त १५ मिनिटं लागतात. मी राजा आहे. मी कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. पण धनूभाऊ, तुमचा निकाल लावल्यानंतरच मी थांबणार आहे,असे गुट्टेंनी सांगितले.
