Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही; मुख्यमंत्र्यांची तिखट शब्दात प्रतिक्रिया

Share

विधान भवनात ऑनलाइन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल करत कोकाटे यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका केली होती, तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोकाटेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी करत सरकारवर हल्लाबोल केला होता.

अखेर, सरकारने कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेऊन त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते सोपवले, तर अजित पवारांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांना नवे कृषिमंत्री बनवण्यात आले आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा करत धनंजय मुंडेंच्या कमबॅकवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चांना फडणवीसांचा खुलासा

कृषी खात्याच्या फेरबदलाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले होते. धनंजय मुंडे यांनी पुन्हा कृषी खाते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात होते.

मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे, पण ती वेगवेगळ्या कारणांसाठी होती. मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाच्या चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाहीत, त्या मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच होतात.” यामुळे मुंडे यांच्या कमबॅकच्या शक्यतेला तूर्तास खीळ बसली आहे.

बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटे प्रकरणावर बोलताना मंत्र्यांना बेशिस्त वर्तनाबाबत कडक इशारा दिला. “आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहोत. आपण काय बोलतो, काय करतो आणि कसे वागतो, यावर जनतेचे लक्ष आहे. मंत्र्यांनी आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. भविष्यात अशी बेशिस्त वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *