CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर…

Pune एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्या वकिलाला ताब्यात घेतले. या वकिलाचे नाव राकेश किशोर असून, या कृत्याबाबत आपल्याला खंत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीला जाऊन त्या वकिलाला गाठल्याची माहिती समोर आली आहे.

भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेश किशोर यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

निलेश लंके दिल्लीत गेले आणि त्या वकिलांना गाठले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. निलेश लंके यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.