पिरंगुट (मुळशी): महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे (२०२५-२०२६)’ मुळशी तालुका स्तरावरील निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये पिरंगुट ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक सुवर्णक्षण रचला आहे. याच स्पर्धेत हिंजवडी ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची घोषणा अद्याप प्रशासनाकडून बाकी आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या बक्षिसांच्या स्वरूपानुसार, तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीला १५ लाख रुपये, तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीला १२ लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून मिळणार आहे. पिरंगुट ग्रामपंचायतीने मिळवलेले हे यश म्हणजे पिरंगुटच्या शाश्वत विकासाची, लोकसहभागाची आणि ग्रामसमृद्धीच्या वाटचालीची एक ऐतिहासिक नोंद मानली जात आहे. ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थांनी विकासासाठी दाखवलेल्या भक्कम एकजुटीमुळे हे अभिमानास्पद यश संपादन करणं शक्य झाले आहे.
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये सुशासन, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, स्वच्छ व हरित गाव, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ई-प्रशासनाचा वापर आणि लोकसहभागातून श्रमदान अशा अत्यंत कडक निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यात आले. या सर्व निकषांवर पिरंगुट आणि हिंजवडीने मुळशी तालुक्यात आपली छाप सोडत अव्वल स्थान निश्चित केले.
या ऐतिहासिक आणि सुवर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण पिरंगुट आणि हिंजवडी ग्रामस्थांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन केले जात आहे. ‘समृद्ध पिरंगुट, आदर्श पिरंगुट आणि गौरवशाली पिरंगुट’ हे गावाने उराशी बाळगलेले ध्येय या यशामुळे खऱ्या अर्थाने सार्थ ठरले असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
यावेळी मुळशी पंचायत समितीचे सदस्य राहुल पवळे यांनी गावकऱ्यांसहित सर्व प्रशासकीय वर्गाचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, “आज खऱ्या अर्थाने गावकऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनाशी समन्वय साधून काम केले आणि त्याचे अखेर फळ मिळाले. मुळशी तालुक्यात नंबर १ ची ग्रामपंचायत म्हणून पिरंगुटची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
— राहुल पवळे
सदस्य, मुळशी पंचायत समिती
