पुणे प्रतिनिधी (CMO Devendra fadnavis) महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सामना वृत्तपत्रात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे.
मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं आणि कुणाला वगळायचं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाहांच्या हाती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले होते
खासदार संजय राऊत म्हणाले, मी काही दिवसांपासून सांगत आहे की, या मंत्रिमंडळातील चार मंत्री बाहेर जाणार आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय राठोड आणि आता योगेश कदम यांचे नाव त्यात जोडले गेले आहे. आणखीही काही नावे समोर येत आहेत. पण फक्त चार मंत्र्यांनाच नाही तर तर संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून नव्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणावे, अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे.
वादग्रस्त मंत्र्यांनी ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोललं जात आहे. यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे. गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.