मत पेट्यांमध्ये फेरफार करण्यासाठी सरकारला 15 दिवस मिळतील, माजी मुख्यमंत्र्याचा आरोप

सांगलीनगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला असून तो 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

यावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खळबळजनक विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

घालमेल करण्यासाठी 15 दिवस मिळतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल पुढे ढकलण्यात आले आहेत. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व सावळा गोंधळ आहे. निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करते हे समोर आलेलं आहे. मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे मतदान पेट्या 15-16 दिवस गोडाऊन मध्ये राहतील. त्यामध्ये काही घालमेल करायचा असेल तर सरकारला भरपूर टाईम मिळेल.

सरकारला अपयश आले

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, या सगळ्या प्रक्रियेमुळे निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे. सरकार व निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहे. कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा सरकारच्या वकिलाने प्रभावीपणे बाजू मांडायला हवी होती. तसे केले असते तर निवडणुका निकाल वगैरे पुढे गेले नसते ती बाजू मांडण्यात सरकारला अपयश आलं आहे.