भारतीय जनता पार्टी पुणे शहर मंडल यांच्या गेल्या काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांमधून नेता अशा धरतीवर निवडणुका झाल्या, संघटनेच्या जोरावर भाजपने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल. आता महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी ‘एक पान – एक कार्यकर्ता’ या रणनितीवर झपाट्याने तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप मंडल अध्यक्षांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत थेट संवाद साधत पुणे मंडल अध्यक्षांनी आगामी स्थानिक निवडणुकांचा फीडबॅक दिला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा दौरा पार पडला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुसंवाद, संघटनशक्ती आणि जमीनीवरील कार्यकर्त्यांचे योगदान याला सलाम करत मंडल अध्यक्षांचे कौतुक केले. “भाजपमध्ये मोठ्या नेत्यांइतकाच मंडल कार्यकर्त्यालाही महत्व आहे हेच भाजपचे वेगळेपण आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ही भेट केवळ फोटोसेशनपुरती मर्यादित न राहता, राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. संसद अधिवेशनाच्या काळात वेळ काढून पुण्यातील मंडल अध्यक्षांसोबत राष्ट्रीय नेत्यांनी दिलेला वेळ ही भाजप नेतृत्वाची कार्यकर्त्यांवरील बांधिलकी अधोरेखित करणारी बाब आहे.
खासदार मोहोळ यांनी स्पष्ट केले, “महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पक्ष संघटन बळकट करणे, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि थेट संवादातून अचूक दिशा मिळवणे हेच या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.”
‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय सुरू…
या दौऱ्यातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची भाजपची पारंपरिक कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. याचे प्रत्यक्ष दृश्य संसदेत झळकले, जिथे राष्ट्रीय नेत्यांसमोर पुणे जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांनी आपले मत, शंका आणि विचार निर्भीडपणे मांडले. यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप संघटना अधिक शिस्तबद्ध आणि सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते. (BJP News)
