Bihar Election Result: बिहारच्या निवडणुका पारदर्शक झाल्यात का : शरद पवार

निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध माध्यमांद्वारे होणारे पैशांचे वाटप निवडणुकांच्या निकालावर परिणाम करणारे ठरते. बिहारच्या झालेल्या निवडणुका खरंच पारदर्शक झाल्या आहेत का?

याचा निवडणूक आयोगाने देखील विचार करावा,” असे भाष्‍य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिहारच्या निकालाबाबत केले.

”महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्तरावर आहेत, त्यामुळे नेत्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले, ”बिहारच्या निवडणुकीपूर्वी पंधरा दिवस सरकारी खजिन्यातील दहा हजार रुपये वाटप करणे हे योग्य आहे का, याचा विचार करायला पाहिजे. मत मिळवण्यासाठी सरकारी खजिना वापरणे, याचा अर्थ सरळ सरळ हा गैरप्रकार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून याबाबत काय करता येईल याचा विचार करू,” असेही त्यांनी नमूद केले.

बिहारच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले, याबद्दल बोलताना पवार म्हणाले, की ज्यांना निवडणूक आयोगाच्या निर्णयांचा फायदा झाला असे पक्ष निवडणूक आयोगाचे आभार मानणारच! त्यात काही विशेष नाही. ज्या संस्थांना घटनात्मक दर्जा आहे, अशा संस्थांनी आपली स्वायत्तता टिकून ठेवणे गरजेचे आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

केळीच्या कायमस्वरूपी निर्यातीसाठी प्रयत्न करणार’

”केळीची कायमस्वरूपी निर्यात व्हावी या दृष्टिकोनातून आपण काही निर्यातदारांबरोबर संपर्क साधून यात काही व्यवस्था करता येते का? याचा प्रयत्न करीत आहोत,” असेही श्री. पवार म्हणाले.

‘पिपाणी गोठविल्याचा फायदा होईल’

निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानताना शरद पवारांनी या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास निश्चितच फायदा होईल, असे श्री.पवार म्हणाले.