Pune पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने बागुल नाराज होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करत नवी राजकीय वाटचाल सुरू केली. बागुल हे गेल्या ३० वर्षांपासून विविध पदांवर राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत.
पक्षप्रवेशानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उल्हास बागुल यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे शहरात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो धक्का दिला आहे त्यातून हा पक्ष अद्याप सावरलेला नाही.
सच्चा कार्यकर्त्याला या पक्षात किंमत राहिलेली नाही, त्यामुळेच अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली आहे. आबा बागुल यांनी कायम सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. त्याच भावनेतून ते यापुढेही कार्यरत राहतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बागुल, काँग्रेस युवा शहर चिटणीस कपिल बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सचिव अभिषेक बागुल, माजी सरचिटणीस हेमंत बागुल, दीपक गावडे, घनश्याम सावंत, विलास रत्नपारखी, जयवंत जगताप तसेच अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
