बाणेर प्रतिनिधी:: पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी नियोजनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. गुरुवारी (दि.17) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते.
मात्र, देखभाल-दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही या भागात पाणी आले नाही.
कामाची अचूकता आणि नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे या प्रकरणावरून दिसून आले. अनेकदा गुरुवारी बंद असलेला पाणीपुरवठा शुक्रवारी पुनः सुरु होतो, मात्र यंदा तेही शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांना ना पुरेसं पाणी मिळालं, ना त्याचा योग्यवेळी पुरवठा झाला. यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून, चाळी व वस्त्यांमध्ये टँकर जाण्याचीही व्यवस्था नसल्याने रहिवाशांची अडचण वाढली आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेविरोधात संताप व्यक्त केला असून, पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीच ठोस माहिती न मिळाल्याने नाराजी आणखी वाढली आहे. काही अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला असता, काहींनी काम पूर्ण होण्यास अजून वेळ लागेल, तर काहींनी शनिवारी (दि.18) पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. मात्र, त्याबाबत कोणताही स्पष्ट आणि ठोस आश्वासक प्रतिसाद मिळालेला नाही.