Anjali Damania : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार अडचणीत? अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार?

Pune Parth Pawar Land Case in Marathi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. आज दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांना त्या जमीनीची पाहणी करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर दमानिया यांनी आक्रमक होत मोठा इशारा देत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

“मी आतापर्यंत जे विषय लढत आहे, त्या विषयांची मी संपूर्ण माहिती घेऊनच बोलते. आता या प्रकरणात ही जमीन नेमकं कुठे आहे? त्याचं लोकेशन काय? त्या जमीनीची सध्याची स्थिती काय? याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मुंडवा येथे आले होते. त्यानंतर मला येथील लोकांनी सांगितलं की परवानगीशिवाय आम्ही तुम्हाला आत सोडणार नाही. त्यानंतर मी या बोटॅनिकल गार्डनच्या डायरेक्टरांना फोन केला. मात्र, ते अतिशय उद्धटपणे बोलले. त्यामुळे आता मी या प्रकरणात अधिकाऱ्यांकडून आणखी माहिती घेऊन उद्या एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहे”, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.