Andekar Vs Komkar: आंदेकरांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीने तिकीट देताच कोमकरही रिंगणात!

Pune news Ncp अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गुंड आंदेकरांना एबी फॉर्म दिला असून या कुटुंबातील दोन जणांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण यामुळं आणखी एक खळबळजनक उमेदवारी जाहीर झाली आहे.

आंदेकर टोळीनं हत्या केलेल्या आयुष कोमकरच्या आईनं म्हणजेच कल्याणी कोमकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देऊ नये अशी विनंती कल्याणी कोमकर यांनी केली होती, पण तरीही उमेदवारी जाहीर झाल्यानं आता त्यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदेकर-कोमकर टोळीचा संघर्ष

बंडू आंदेकर हा पुण्यातील नाना पेठ भागात राहणारा कुख्यात गुंड आहे. त्याचा मुलगा वनराज आंदेकर हा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. गेल्याच वर्षी त्याची नाना पेठेतच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर वनराजचा सख्खा भाचा अर्थात बहिण कल्याणी कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर या १९ वर्षीय मुलाला आंदेकर टोळीच्या लोकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. तीन महिन्यांपूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्यात भरदिवसा हे हत्याकांड घडलं होतं. पोलिसांना या हत्येची खबर मिळूनही त्यांना हे हत्याकांड रोखण्यात अपयश आलं होतं.

दरम्यान, वनराज आंदेकरचा खून आयुष कोमकरचे वडील गणेश कोमकर यानंच घडवून आणल्याच्या संशयातून वनराजच्या खूनाचा सूड घेण्यासाठी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला संपवण्याचा कट आंदेकर टोळीनं रचला होता. हा कट कुख्यात बंडू आंदेकर यानंच रचला होता म्हणजेच त्यानं आपला नातू असलेल्या (मुलीचा मुलगा) आयुष कोमकरचा खून घडवून आणला असल्याचा आरोप आहे. याच आरोपांखाली आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्यासह १५ जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती.