आंबेगाव,कात्रज, बालाजीनगर मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भाजपचा रोडमॅप
पुणे प्रतिनिधी -: पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आंबेगाव,कात्रज, बालाजीनगरमधील परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भाजपने थेट लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजपचे उमेदवार संदीप बेलदरे यांनी “विकास कागदावर नव्हे, तर रस्त्यावर दिसला पाहिजे” या भूमिकेतून प्रभागातील वाहतूक आणि रस्ते व्यवस्थेसाठी सविस्तर आराखडा निश्चितपणे करू व या भागाला कायमस्वरूपी ट्राफिक मुक्त करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
बेलदरे यांच्या मते, प्रभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे वाहनांचे प्रमाण आणि अपूर्ण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकणे नव्हे, तर ही कोंडी प्रत्यक्षात सोडवणे हेच खरे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘दस मे बस’ने सार्वजनिक वाहतुकीला चालना
प्रभागात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘दस मे बस’ योजना राबवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेत १० किलोमीटरपर्यंत फक्त १० रुपयांत प्रवास करता येणार असल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
संदीप बेलदरे यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ३८ मध्ये त्यांच्या उमेदवारीभोवती विकासाच्या अपेक्षांचे वातावरण तयार झाले असून, निवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर नागरी जीवनाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
