pune खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहाराची प्रकरणे उघड झाल्यानंतर आता जिल्ह्यातील देवस्थान, वतन, आदिवासी, सरकारने कब्जेहक्काने अथवा भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्ग-२ प्रकारातील सुमारे २ हजार जमिनींची तपासणी तहसीलदारांमार्फत सुरू करण्यात आली आहे.
वर्ग २ जमिनींनी विषयी थोडक्यात
◼️ जमिनींचे वर्ग-१ आणि वर्ग-२ असे प्रकार आहेत.
◼️ वर्ग-२ मध्ये देवस्थान, प्रकल्पग्रस्त, वतन, पुनर्वसन, सीलिंग, आदिवासी, तसेच सरकारकडून वाटप करण्यात आलेल्या, भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी येतात.
◼️ या जमिनी सरकारकडून काही अटी-शर्तीवर दिल्या जातात.
◼️ त्यांच्या विक्री-खरेदीसाठी संबंधित संस्थांची परवानगी घ्यावी लागते.
◼️ राज्य सरकारकडून नजराणा शुल्क भरून घेतल्यानंतर या जमिनीची विक्री करता येते.
◼️ त्यानुसार पुनर्वसन, कुळ जमिनीची विक्री परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना, आदिवासी, देवस्थानच्या जमिनी विक्रीचे अधिकार सरकारला आणि शासकीय जमिनीचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
◼️ त्यामुळे वर्ग-२ च्या जमिनीची विक्री-खरेदी करताना परवानगी न घेतल्यास तो शर्तभंग होऊन ती जागा सरकार जमा होऊ शकते.
अशी तपासणी होणार
वर्ग दोनच्या जागेच्या तपासणीसह पंचनामे जागेवर प्रत्यक्ष जाऊन होणार आहेत. तपासणीत ज्या वर्षी ही जागा सरकारकडून देण्यात आली आहे, देताना कोणत्या अटी-शर्ती घालण्यात आल्या होत्या, त्या अटी-शर्तीनुसार जागेचा वापर होतो आहे का, की अन्य वापर सुरू आहे, ती भाड्याने त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आली आहे का, उद्देश सोडून अन्य कारणांसाठी वापर होतो आहे का, जागेचा परस्पर व्यवहार झाला आहे का, अशा सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे.
