अजितदादांना केलेला व्हॉट्सअप कॉल, रोहित पवारांनी दाखवला स्क्रिनशॉट

Pune राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्याच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला.

या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांचे जाणं हे पवार कुटुंबासाठी मोठा आघात होता. आज २८ फेब्रुवारी असून या घटनेला १ महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केलीय की, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..खूप वेदनादायी..! असं म्हणत त्यांनी व्हॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉट दाखवला आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांची उणीव कायम भासेल असं म्हटलं आहे. आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.