मा. आमदार शंकरदादा मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिलिंददादा वाळंज यांच्या पुढाकारातून पौड–आंबडवेट गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम; शिष्यवृत्ती मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप आणि ISRO–NASA परीक्षा तयारी मार्गदर्शन वर्गांची घोषणा
पौड, दि. २१ जुलै : स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा स्मृती पर्व’ या वर्षभर राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची घोषणा करण्यात आली. शिक्षण, विकास आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या अजितदादांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत पौड–आंबडवेट जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप, ISRO–NASA परीक्षा तयारीसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, अभ्यासदौरे (Study Tours), स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बनविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.
पुणे जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य मा. मिलिंददादा वाळंज यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि जिल्हा परिषद शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणे हा आहे.
स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांनी शिक्षण, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत, त्यांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्याचा संकल्प या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
