Pune उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामती जवळ विमान अपघातात कालवश झाले. सकाळी 8.45 वाजता झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसला.
राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दिवसभर आज बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने आले होते. परंतु सकाळी 8.45 च्या सुमारास बारामती विमानतळा जवळच ते विमान कोसळले आणि जळून खाक झाले. विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण होते. या सगळ्यांना काळाने हिरावून नेले.
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर फार मोठी छाप पाडली होती. सुरुवातीला काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली जरी ते वाढले तरी त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले होते. उत्तम संघटना कौशल्य आणि काम करण्याचा झपाटा ही अजित पवारांची वैशिष्ट्ये होती. आपल्या परखड स्वभावामुळे आणि कार्यशैलीमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. हे काम होईल ते होईलच आणि जे होणार नाही ते होणार नाही असे सांगण्याची त्यांची धमक होती आणि त्या पद्धतीनेच ते राजकीय दृष्ट्या वर्तणूक करत होते.
– 1991 मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात
अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले. परंतु, शरद पवार संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर त्यांनी बारामतीची लोकसभेची जागा त्यांच्यासाठी सोडली आणि ते बारामतीतूनच पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर राज्यामध्ये जलसंपदा, सह अनेक खात्यांचे ते मंत्री झाले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते.
