Mulashi nere dattanagar shinde mulashi taluka नेरेच्या जानवीची इस्रोपर्यंत झेप; मुळशी तालुक्याचा अभिमान उंचावला!

Pune मुळशीच्या लेकीची गगनभरारी जानवी शिंदे हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्थानिवड

पुणे जिह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱया जानवी शिंदे हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या विशेष अभ्यास दौऱयासाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना मिळवलेल्या या यशामुळे जानवीने नेरे गावासह संपूर्ण मुळशी तालुक्याची मान उंचावली आहे.
जानवीने कासारसाई आणि बावधन येथे झालेल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतरच्या निवड प्रक्रियेतील विविध टप्प्यांवरही तिने आपली गुणवत्ता सिद्ध करत अंतिम निवडीत स्थान मिळवले. जिद्द, मेहनत, सातत्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने ही खडतर निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार केली.
ग्रामीण शाळेतील विद्यार्थिनीची अंतराळ संशोधन संस्थेपर्यंतची झेप महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ‘इस्रो’चा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाचे जग जवळून समजून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी असते. देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया संस्थेला भेट देण्याची संधी जानवीला मिळणार असल्याने तिच्या शैक्षणिक प्रवासातील हा निश्चितच महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरणार आहे.
जानवीचे वडील अविनाश शिंदे हे पुणे जिह्यातील प्रसिद्ध गाडामालक आहेत. जानवीच्या या यशामागे तिच्या कुटुंबीयांसोबतच शिक्षक आणि मार्गदर्शकांचेही योगदान आहे. तिच्या यशाबद्दल शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मार्गदर्शकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लेकीच्या यशानंतर जानवीच्या वडिलांचा पालकांना मोलाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले, ‘साधारणत पालकांचा मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्याकडे कल खूप वाढला असतो, परंतु मराठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येसुद्धा चांगले शिक्षण मिळते. इंग्रजी माध्यमाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतसुद्धा ‘ग्रेट’ शिक्षक आणि शिक्षिका उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.’
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (घ्एRध्) अभ्यास दौऱयात विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मिती, अंतरिक्ष यान प्रक्षेपण केंद्र आणि अंतराळ विज्ञानाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळते. त्यामुळे मुलांचे या ठिकाणाला भेट देण्याचे स्वप्न असते. विज्ञान विषयात गती असलेल्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाते. जानवीची शैक्षणिक प्रगती, तिची विज्ञान विषयातील रुचीच तिला स्वप्नांकडे घेऊन जाण्याचा मार्ग ठरली आहे. त्यामुळेच प्रत्येक मुलाने शालेय जीवनातच आपले ध्येय, विषयातील रुची लक्षात घेऊन त्यानुसार शाळांनी व पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे, असे मत तिचे शिक्षक व्यक्त करतात.
गावाकडच्या मातीतूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि जिद्द व मेहनतीच्या बळावर ती प्रत्यक्षात आणता येतात, हे जानवीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.