मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन; तहसीलदारांना निवेदन

पौड, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : मुळशी तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी आज पौड येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनानंतर मा. तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे यांना निवेदन देण्यात आले. मुळशी तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना मुळशी तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून प्रशासनासमोर मांडण्यात आली. सध्याची परिस्थिती गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनाला मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी सभापती महादेव अण्णा कोंढरे, उपसभापती दगडू काका करंजावणे, शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके, माजी सरपंच राहुल जाधव यांच्यासह मुळशी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, लोकनियुक्त सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मुळशी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि नागरिकांनी एकत्र येत मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली.

मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक शासकीय मदत व सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.