पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपरीत हुंडाबळी गेलेल्या शिल्पा सचिन गवारे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेनंतर महापालिकेच्या सभेत त्यांच्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता.
या अत्यंत गंभीर आणि दु:खद प्रसंगी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर या चक्क हसल्याने सभागृहातील उपस्थितांसह सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट पसरली आहे.
एका महिलेच्या आत्महत्येसारख्या अत्यंत संवेदनशील आणि दुःखद घटनेवर शोक व्यक्त करताना लोकप्रतिनिधी म्हणून किमान औचित्य आणि गांभीर्य बाळगणे आवश्यक होते. मात्र, उपमहापौरांचे हे बेजबाबदार वर्तन सर्वांनाच खटकले आहे.
शिपायाने कानात काय सांगितले? पालिका वर्तुळात चर्चांना उधाण
उपमहापौर शर्मिला बाबर शोकप्रस्तावावर बोलत असताना महापालिकेचा एक शिपाई दोन वेळा त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगून गेला. शिपायाने कानात सांगणे आणि त्यानंतर उपमहापौरांचे हसणे, या प्रकारामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्या शिपायाने नक्की काय सांगितले आणि अशा गंभीर प्रसंगी उपमहापौरांना हसू का आवारात आले नाही, याबाबत आता महापालिकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
सर्वस्तरातून टीकेची झोड
जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एवढ्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने शोकप्रस्तावादरम्यान दाखवलेल्या या बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनावर सर्वस्तरातून जोरदार टीका होत आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रसंगी तरी आपल्या वर्तनाचे भान ठेवायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शिल्पा गवारे आत्महत्या नाही तर हत्या, माहेरच्या मंडळींचा गंभीर आरोप
वाकडच्या उच्चभ्रू कुटुंबातील शिल्पा गवारे या विवाहितेच्या दुर्दैवी मृत्यूने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 17 वर्षांच्या संसारानंतर शिल्पा गवारे यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, माहेरच्यांनी सासरच्यांवर अतोनात छळ करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी शिल्पाचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी शिल्पाचा पती सचिन गवारे, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे
