Pune भाजप नेते तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय दणका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना विजयी करण्यासाठी शेखर गोरे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने माण-खटाव मतदारसंघात नव्या राजकीय समीकारणांची नांदी होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने शेखर गोरे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या नाराजीनंतर शेखर गोरेंनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केल्याचे बोलले जात आहे. गोरेंनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या गोटात आणि विशेषतः माण-खटावच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
