ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुवर्णसंधी! योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवून आणण्यासाठी राबवली जाते. २०१२ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना विशेष ट्रेनद्वारे तीर्थयात्रा करता येते.

प्रवासासोबतच राहणे, जेवण, पिण्याचे पाणी आणि आवश्यक स्थानिक प्रवासाचा खर्चही सरकार आणि IRCTCकडून केला जातो.

६० वर्षांवरील पुरुष, ५८ वर्षांवरील महिलांना लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मध्य प्रदेशचा रहिवासी आणि आयकरदाता नसणे आवश्यक आहे. पुरुषांचे वय किमान ६० वर्षे, तर महिलांसाठी वयोमर्यादा ५८ वर्षे आहे.

पती-पत्नीपैकी एका व्यक्तीने वयोमर्यादा पूर्ण केली असल्यास दुसऱ्या जोडीदाराचे वय कमी असले तरी त्याला किंवा तिला सोबत यात्रेला जाता येते. ६० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांसाठी वयोमर्यादेची अट लागू नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकट्या ज्येष्ठांसोबत केअरटेकरला परवानगी

६५ वर्षांवरील एकटे ज्येष्ठ नागरिक तसेच ६० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तीला प्रवासासाठी एका केअरटेकरला सोबत नेता येते. त्यामुळे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मदत मिळू शकते.

ट्रेन, राहणे आणि जेवण मोफत

यात्रेकरूंसाठी विशेष IRCTC ट्रेन, प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी तसेच तीर्थक्षेत्रावर मुक्कामाची व्यवस्था केली जाते. आवश्यकतेनुसार स्थानिक ठिकाणी जाण्यासाठी बसची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक

यात्रेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रवास करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. अर्जासोबत अधिकृत डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यात टीबी, हृदयविकार किंवा संसर्गजन्य आजार नसल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

२५ जणांचा गट एकत्र अर्ज करू शकतो

योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २५ जणांचा गट एकत्र अर्ज करू शकतो. या गटातील एका व्यक्तीची मुख्य अर्जदार म्हणून निवड केली जाते. प्रवासादरम्यान आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यांसारखे वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

दागिने आणि मौल्यवान वस्तू नेण्यास मनाई

यात्रेकरूंनी दागिने, मौल्यवान वस्तू, ज्वलनशील पदार्थ तसेच दारू आणि तंबाखूसारखे मादक पदार्थ सोबत नेऊ नयेत. मात्र आवश्यक औषधे, ऋतूनुसार कपडे, चादर, टॉवेल आणि वैयक्तिक वापराचे साहित्य सोबत ठेवता येते.