मुळशीतील रिंगरोडच्या आजूबाजूच्या शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या? सगळ्यांचा हिशोब होणार

Pune सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या ‘देऊळ बंद २’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमावर काहींनी टीकाही केली. त्यावर प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तरही दिलं.

त्यामुळे प्रवीण तरडे स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अशातच आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रवीण तरडे यांची पोस्ट
प्रवीण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या ५ वर्षांत रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या. सगळ्यांचा हिशोब होणार. मूळ मालक शेतकरीच!’ ही पोस्ट शेअर करत प्रवीण यांनी, ‘आता मोठमोठे अंगावर येतील. पण पर्याय नाही शेवटी मुळशीकर आहे. बोलावं तर लागणारच..’ असं कॅप्शन लिहिलं आहे. प्रवीण तरडे यांच्या या पोस्टवर अनेकांनी ‘मुळशी पॅटर्न २’ अशा कमेंट्स करत सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये प्रवीण तरडे यांनी मुळशी येथील जमिनींची विक्री आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचं चित्र केलं होतं. त्यामुळे आता प्रवीण यांच्या या पोस्टनंतर ‘मुळशी पॅटर्न २’ या सिनेमाची शक्यता वर्तवली आहे.

मुळशी पॅटर्न २’ बद्दल काय म्हणालेले प्रवीण तरडे?
एका मुलाखतीमध्ये ‘मुळशी पॅटर्न २’ बद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले होते की, ‘मुळशी पॅटर्न २’ मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं? याचं उत्तर या चित्रपटातून मिळेल. ‘मुळशी पॅटर्न २ – तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’ हेच चित्रपटाचं शीर्षक असेल. हा चित्रपट इतका खतरनाक असेल की, तो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल आणि शहारे येतील.’ ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न २’ बद्दल सांगितलेलं.

दरम्यान, प्रवीण तरडे यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.